लांजा: लांजा येथे नुकतेच दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला लाभार्थींची मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून आले.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि लांजा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ‘एडिप’ (ADIP) आणि ‘वयोश्री’ या भारत सरकारच्या योजनांखाली दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना बुधवार, १८ जून रोजी लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मोफत साहित्य वाटप करण्यात आले. या वाटप कार्यक्रमात १६५ दिव्यांग व्यक्ती आणि ४३९ ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ६०५ व्यक्तींना विविध प्रकारचे साहित्य मिळाले.
यावेळी तहसीलदार प्रियंका ढोले, प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सहायक गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे तालुका अध्यक्ष गुरूप्रसाद देसाई, न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे मुख्याध्यापक सुनील पाटोळे यांसह ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे गरजू दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.