राजापूर : तालुक्यातील पालये गावात एका ३० वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालये वाडा येथील रहिवासी प्रतिक्षा वसंत पेडणेकर (वय ३०) ही तरुणी रविवारी १४ सप्टेंबर २०२५ रोजी बेपत्ता झाली होती. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिचे वडील वसंत पेडणेकर हे नेहमीप्रमाणे आपली गुरे चरवण्यासाठी रानात घेऊन गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते परत आल्यावर त्यांना आपली मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी तिचा आजूबाजूला शोध सुरू केला.
शोध घेत असताना त्यांना घराशेजारील पाण्याच्या वहाळात (विहिरीसारख्या खोल जागेत) प्रतीक्षा उपडी अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तातडीने तिला बाहेर काढून उपचारासाठी राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती प्रतीक्षाला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३१ वाजता नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.