GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: मांडकी-पालवण येथे कृषी दिन उत्साहात

Gramin Search
6 Views

चिपळूण : मांडकी-पालवण  येथील कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा करण्यात आला.

हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. दूरदृष्टीचे नेते आणि कृषी क्षेत्राचे कैवारी वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथे झाला. ते १९६३ ते १९७५ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या १२ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या कृषी विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दुष्काळ निवारण, सिंचन प्रकल्पांना चालना, कृषी विद्यापीठांची स्थापना आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रचार यांसारख्या योजनांमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली.

आजही महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अनियमित पाऊस, वाढते उत्पादन खर्च, आणि बाजारभावातील अस्थिरता यांसारख्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. मात्र, शासन आणि कृषी संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कृषी दिनानिमित्त आवाहन केले जाते की, सर्वांनी मिळून शेती क्षेत्राला अधिक सक्षम आणि टिकाऊ बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषी दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण केले. महाविद्यालयाच्या शेतावर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे लावण्यात आली.

कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2650865
Share This Article