अलिबाग: अलिबाग शहरात काही महिन्यांपूर्वी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या एका जोडप्याला अटक केल्यानंतर, आता पुन्हा एकदा पोलिसांनी छुप्या पद्धतीने चालणाऱ्या देहविक्री व्यवसायावर कारवाई केली आहे. वरसोली येथील ‘लोटस लॉजिंग’ येथे हा अवैध व्यवसाय चालवणाऱ्या राजेश रामलखन चौपाल आणि जोत्स्ना दास या दोघांना अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वेश्या व्यवसायासाठी असलेल्या पीडितेची पोलिसांनी सुटका करत तिला महिला सुधारगृहात पाठवले आहे.
वरसोली येथील ‘लोटस लॉजिंग’वर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी संध्याकाळी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सत्यभामा खरात, पोलीस हवालदार जयेंद्र पाटील, परेश म्हात्रे, महिला पोलीस हवालदार मयुरी जाधव, पोलीस शिपाई शुभम नांदगावकर, अनिकेत पाटील, अनिकेत ढिवरे आणि सुनिल जाधव यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी दोन महिलांना पंच म्हणून पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करून देहविक्रीचा व्यवसाय चालू असल्याची खात्री केली. खात्री होताच, बनावट ग्राहकाने पोलिसांना सांकेतिक इशारा दिला आणि तात्काळ पोलीस पथकाने धाड टाकून वेश्या व्यवसायासाठी आलेल्या पीडित मुलीला मुक्त केले.
या प्रकरणी पोलीस शिपाई अनिकेत ढिवरे यांनी राजेश रामलखन चौपाल आणि जोत्स्ना दास यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अलिबाग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३(५) सह अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे दिसून आले आहे.