GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या पावासाळी सहलीत विद्यार्थ्याने रेखाटली शेकडो निसर्ग चित्रे !

Gramin Varta
59 Views

संगमेश्वर:- कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कलामहाविद्यालय, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे (संलग्न – महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई) हे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कलानुभवासाठी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करत असते. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी थेट साक्षात्कार घडतो आणि कलेचा मूळ गाभा अनुभवता येतो.
यंदाची पावसाळी सहल २०२५ देवरुख परिसरातील लक्ष्मीबाई पित्रे चित्र संग्रहालय, डी कॅड कॉलेज, पालकर फाउंडेशन- विघ्रवली आणि ओली माती पॉटरी वर्कशॉप या ठिकाणी पार पडली.

सहलची सुरुवात लक्ष्मीबाई पित्रे चित्र संग्रहालयाला भेट देऊन झाली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोकणातील चित्रसंस्कृतीचा इतिहास, पारंपरिक तैलचित्रे आणि स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींचा अभ्यास केला. संग्रहालयातील निसर्गचित्रे आणि लोकजीवनावर आधारित कलाकृतींनी विद्यार्थ्यांना नव्या दृष्टीकोनाची ओळख करून दिली. या अनुभवावर आधारित अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर निसर्गचित्रे रेखाटली.

यानंतर डी कॅड कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आधुनिक कला शिक्षणातील पद्धती, माध्यमांचा वापर आणि संकल्पनाधारित कलेचे बारकावे जाणून घेतले. यानंतर विद्यार्थ्यांनी पालकर फाउंडेशन, विघ्रवली येथे दुपारनंतर निसर्गचित्र निर्मिती केली. पावसाळी वातावरण, हिरवीगार झाडी, आणि ओलसर माती यांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमांतून कोकणाचा निसर्ग आपल्या कॅनव्हासवर उमटवला. प्रा. विक्रम परांजपे यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्र प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी रंगसंगती, रचना व निसर्गातील प्रकाशछटा कशा टिपाव्यात याचे मार्गदर्शन दिले.

सहलच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी ओली माती पॉटरी वर्कशॉप येथे सहभाग घेतला. मातीपासून आकारनिर्मिती, टेक्स्चरिंग आणि बर्निशिंगच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी शिल्पकलेचे बारकावे आत्मसात केले. मातीशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवीन प्रेरणा मिळाली. या संपूर्ण सहलीत सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे चेअरमन तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य प्रा. माणिक यादव, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कलात्मक मार्गदर्शन केले.

या  पावसाळी सहलीत विद्यार्थ्यांनी साकारलेली  चित्रे आणि शिल्पे सह्याद्रि कलादालन, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे १४ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत प्रदर्शित होणार आहेत. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्घाटक म्हणून सौ. प्रज्ञा मिलिंद जोगळेकर (प्रमुख सल्लागार, ग्रामकौशल फाउंडेशन, चिपळूण) उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान आमदार शेखर गोविंदराव निकम (चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ, कार्याध्यक्ष – सह्याद्रि शिक्षण संस्था) हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के (चेअरमन, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे) व महेश मनोहर महाडिक (सचिव, सह्याद्रि शिक्षण संस्था) उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलेतून उमटलेला हा निसर्गाचा प्रवास केवळ चित्रांपुरता मर्यादित नाही, तर तो अनुभव, भावना आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. सर्व कलारसिकांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी.”प्राचार्य प्रा. माणिक शिवाजी यादव

Total Visitor Counter

2648021
Share This Article