GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत पाच दुचाकी जळून खाक; बॅटरी स्पार्क झाल्याने लागली आग

Gramin Varta
155 Views

दापोली :  शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फॅमिली माळ येथील आयशा प्लाझा परिसरात दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीच्या बॅटरीमध्ये अचानक बिघाड होऊन तिने पेट घेतला. ही आग इतक्या झपाट्याने वाढली की, परिसरातील इतर चार दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.

अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. आग वेळीच लक्षात न आल्याने ती वेगाने पसरली आणि काही क्षणांतच लगतच्या चार दुचाकींना तिने आपल्या विळख्यात घेतले. या चार दुचाकी पूर्णपणे कोळसा झाल्या, तर एका दुचाकीला आगीची मोठी झळ बसून ती होरपळली.

या घटनेमुळे दापोली नगरपंचायतीकडे मोठ्या क्षमतेचा अग्निशमन बंब  नसल्याची कमतरता पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. आग लागल्यानंतर नागरिकांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण आग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आले. यानंतर तातडीने नगरपंचायतीचा दुचाकीवर बसवलेला छोटा फायर फायटर घटनास्थळी दाखल झाला. फायर फायटरने पाण्याचा प्रभावी वापर करत आग पूर्णपणे विझवली. यामुळे परिसरातील इतर वाहने किंवा इमारतींना होणारा संभाव्य मोठा धोका टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे, प्रशांत विचारे, नितीन इंदुलकर, संदीप डिंगणकर, श्रीकांत पवार, दीपक गोरीवले आणि सचिन घाग यांनी मोलाचे सहकार्य केले.

Total Visitor Counter

2648140
Share This Article