GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना, प्रविण दरेकर पहिले अध्यक्ष

Gramin Varta
53 Views

दरेकर अभ्यासगटानेच केली होती प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस; प्रवीण दरेकर यांना मंत्री पदाचा दर्जा

मुंबई: राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे.या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

२०१९ मध्ये शासनाने स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना विविध सवलती दिल्या होत्या; मात्र त्यांची अंमलबजावणी अनेक ठिकाणी झालेली नव्हती. यासंदर्भात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदांमधून आलेल्या मागण्यांवर उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला होता. या अभ्यासगटाने मागील अधिवेशनात शासनाला सादर केलेल्या अहवालात स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची शिफारस केली होती. शासनाने या शिफारशीची अंमलबजावणी करून प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, आमच्या अभ्यासगटाने शासनाला सखोल शिफारशी केल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे हे स्वतंत्र प्राधिकरण. राज्यातील विशेषतः मुंबई, उपनगरे, पुणे, नाशिक व नवी मुंबईत स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. प्राधिकरणामुळे या क्षेत्रात मोठे काम होऊ शकेल. सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देणे शक्य होईल. यापूर्वीही मुंबई बँकेच्या माध्यमातून स्वयंपुनर्विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे उदाहरण आपण पाहिले आहे. शासनाने आमच्यावर दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून आगामी काळात स्वयंपुनर्विकास क्षेत्रात मोठे काम झाल्याचे सर्वांना दिसून येईल.

दरम्यान, दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

Total Visitor Counter

2652391
Share This Article