GRAMIN SEARCH BANNER

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री

Gramin Varta
117 Views

मुंबई: देशात आज, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याचे वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारे आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रसिद्ध गीतकार, शायर मनोज मुंतशीर यांची संकल्पना असलेल्या ‘मेरा देश पहिले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ या संगीतमय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

बांद्रा-कुर्ला संकुलातील नीता अंबानी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री विनोद तावडे, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या रूपाने एक असा नेता लाभला आहे, ज्यांनी नवभारताची निर्मिती केली. आज भारत जागतिक स्तरावर सन्मानाने उभा आहे, आणि त्याचे संपूर्ण श्रेय प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या दूरदृष्टीला जाते.

मागील 11 वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला, विकासाला नवीन दिशा दिली आहे. गरिबी हटवण्यासाठी निर्णायक लढा दिला आहे. आता भारत जगात सर्व मंचावर पूर्ण सन्मानाने व ताकदीने उभा आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, 22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या सेकंड जनरेशन जीएसटी सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती तर मिळणार आहेच. शिवाय सर्व सामान्यांना फायदा होईलच, त्याबरोबरच आपला देश आत्मनिर्भर भारताच्या दिशेने अग्रेसर होईल.

प्रधानमंत्री मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘अनटोल्ड स्टोरी’ विषयी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, एक नवा भारत, एक शक्तिशाली भारत, एक लीडर भारत, मोदीजींनी तयार केला आहे, तो करत असताना मोदीजींच्या जीवनाचे अनेक पैलू हे आपल्यासमोर आले आहेत. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व कसे तयार झाले? कोणत्या कठीण परिस्थितीतून ते गेले? देशासाठी समर्पित असलेलं त्यांचे जीवन टप्प्याटप्प्याने कसे घडले, हे अप्रकाशित पैलू या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या सर्व गोष्टी प्रेरणादायी आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

प्रसिद्ध गीतकार, शायर मनोज मुंतशीर यांन ‘मेरा देश पहिले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ या संगीतमय कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून त्यांच्या राजकीय प्रवासापर्यंत, आव्हानात्मक काळ, नेतृत्त्वाची भूमिका, तसेच आयुष्याच्या अशा पैलूंचे सादरीकरण केले.

Total Visitor Counter

2647203
Share This Article