विद्यार्थी मात्र गळक्या खोल्यांमध्ये गिरवताहेत शिक्षणाचे धडे
चिपळूण: एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचा ढिंडोरा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पिटवला जात आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. चिपळूण तालुक्यातील तब्बल ३९ शाळांची विदारक अवस्था समोर आली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटूनही या शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना गळक्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. भाषेवरून राजकारण करणाऱ्या पक्षांना या गोष्टीचे ना सोयर आहे ना सुतक.
खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असले तरी आजही जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती जैसे थे आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा शिक्षणासाठीचा आधार बनून राहिल्या आहेत. यातील ३९ शाळा नादुरुस्त असून, त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव त्या त्या शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठविले आहेत. निवडणुकीदरम्यान काही शाळांची दुरुस्ती झाली. तरीही तालुक्यातील ३९ शाळा नादुरुस्त आहेत. दुरुस्तीमध्ये छप्परै, वर्गखोली, खिडकी दुरुस्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.
शाळांमध्ये कोणती भाषा शिकवावी, त्याची सक्ती करावी की नाही, याबाबत मोर्चा काढण्याचा इशारा देणारे नंतर जल्लोष करणारे विविध राजकीय पक्ष ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीबाबत मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अधिवेशनातही आवाज उठवताना लोकप्रतिनिधी दिसत नाहीत.
दुरुस्तीची गरज असलेल्या शाळा
तालुक्यातील गोंधळे, भोसले, हडकणी, कोळकेवाडी जांबराई, गोवळकोट मराठी शाळा मूर्तवडे नं. २, कळंबट ब्राह्मण गव्हाळवाडी, उमरोली नं. एक, चिपळूण कन्या शाळा, पाग मुलांची शाळा, असुर्डे बनेवाडी, मार्गताम्हाणे, दहिवली खुर्द, कापरे देऊळवाडा, गांग्रई गावनवाडी नं. १, पाचाड नं. १, गुळवणे, कुंभार्ली नं. १, मांडकीखुर्द, राधानगर, वीर नं. ४, खांदाट पुनर्वसन, विद्यामंदिर सती, पोफळी ऐनाचेतळे, नांदिवसे गावठाण, कामथे नं. २, पिलवलीतर्फे वेळंब, खेरशेत नं. २, टाकेवाडी, कोळकेवाडी हसरेवाडी, कोळकेवाडी पठारवाडी, कोसबी घाणेकरवाडी, आगवे नं. १, असुडें नं. ३, बोरगाव नं. १, उभळे नं. २, नांदिवसे लुगडेवाडी या शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
चिपळुणात 39 शाळांची विदारक स्थिती, राजकीय पक्ष मात्र चिडीचूप

Leave a Comment