पोलिस कर्मचारी 12 वर्षे घेताहेत भाड्याचा खोलीचा आसरा
राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर वरची पेठ येथे राजापूर शहरातील पोलिसांसाठी पोलिस लाइन उभारण्यात आली आहे. ही लाइन अतिशय जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी पोलिसांना वास्तव्य करणे अतिशय कठीण झाले आहे. गेली 12 ते 15 वर्षे या पोलिस लाईनकडे लक्ष देण्यात आलेले नाही. येथे असलेले पोलिस कर्मचारी भाड्याने रहात आहेत. मात्र पोलिस कोणत्याही प्रकारे आवाज उठवत नसल्याने राजकीय नेत्यांनाही त्यांचे दुखणे जाणून घेण्याची सवडच मिळाली नाही. माजी आमदार राजन साळवी यांच्या काळात या लाईनची बिकट अवस्था आलेली आहे. छप्पर गळतंय, भिंती उखडल्या आहेत, आणि आता त्या खोलीचा ताबा विंचू, उंदीर, जनावरांनी घेतलाय.
ही पोलीस लाईन इतकी जीर्ण झाली आहे की ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. पावसात छप्पर गळतं, भिंती उखडल्या आहेत, आणि सुरक्षितता नावालाही उरलेली नाही. त्यामुळे पोलिसांना हक्काचं घर असूनही ते वापरता येत नाही, आणि त्यांना नाईलाजाने भाड्याच्या रूममध्ये स्थलांतर व्हावं लागतं आहे आधीच अत्यल्प पगार, त्यात रूमचे भाडे आणि खानावळीत पैसे घालायचे. अर्धा पगार यातच संपतो.
12 तास ड्युटीनंतर थकलेला पोलीस जेव्हा घरात परततो, तेव्हा त्याला हवी असते फक्त शांत झोप.. पण त्या घरात मिळतं फुटकळ कौलं, भिंतीतून झिरपणारं पाणी आणि नैराश्याचं सावट. शेवटी त्यांनाही भाड्याच्या खोलीचा आधार घ्यावा लागतो आणि पगाराचा अर्धा भाग तिथेच संपतो.
ही अवस्था वर्षानुवर्षे आहे, पण लोकप्रतिनिधींना याकडे वळून पाहायला वेळ नाही. स्वतः एसीमध्ये, बंगल्यांमध्ये सुखात राहत असलेल्या नेत्यांना पोलिसांची तगमग काय कळणार?
एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “कामाच्या तणावानंतर घरात गेल्यावर थोडा फ्रेश वाटावं, मनाला शांतता मिळावी असं कोणाचंही स्वप्न असतं. पण आमचं ते स्वप्न घराच्या उंबरठ्यापासूनच तुटतं. भाड्याच्या खोलीत, अर्धा पगार खर्चूनही, आम्हाला त्या जगण्याची शाश्वती नाही.”
लोकप्रतिनिधी मात्र आरामात एसीमध्ये, आलिशान बंगल्यांमध्ये कोणत्याही चिंता, तणावाशिवाय असतात. त्यांना या पोलिसांच्या व्यथा, झोपेचा संघर्ष, आणि नैराश्याचा गंध कसा कळणार? राजापूरमध्ये गेली 15 वर्षे पोलिस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे, अनेक वेळा पाठपुरावा होऊनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पोलिसांना घर मिळावं म्हणून लोकप्रतिनिधींना वेळच नाही, कारण त्यांची काळजी त्यांच्या ‘बंगल्यापुरती’च राहली आहे.
मनसेचे अमृत तांबडेनी पोलिसांच्या घरासाठी दिला होता लढा
पोलिसांना हक्काच घर मिळाव यासाठी राजापूर येथील मनसेचे कार्यकर्ते अमृत तांबडे यांनी पोलिस अधिक्षकांपासून मंत्रालयापासून पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी उपोषणे केली. मंत्र्यांना निवेदने दिली. मात्र निगरगट्ट लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षच केले. अखेर तांबडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्याने मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली. पोलिसांच्या घरासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश तत्कालीन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिले होते. मात्र कुलकर्णी यांनीही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे पोलिसांच्या घराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.
सांगा ! राजापूर शहरातील पोलिसांनी या घरात राहायचं तरी कसं; पोलिस लाइनची बिकट अवस्था
