GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : पत्रकार कॉलनी शेजारच्या नियोजित बारला विरोध

रत्नागिरी: कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील पत्रकार कॉलनीशेजारी नव्याने सुरू होऊ घातलेल्या बार विरोधात परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी एकत्र येत सही मोहीम राबवून पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत तसेच राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

विकास सदाशिव चव्हाण यांनी त्यांच्या राहत्या घरात भाऊबीज बंगला, ३/२१४, पत्रकार कॉलनी शेजारी, कुवारबाव, रत्नागिरी येथे बार सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना मिळवण्याचा अर्ज केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून परिसराची पाहणीही झाली आहे.

या परिसरात शासनाच्या भूखंडावर पत्रकार कॉलनी, भूविकास कॉलनी अशा निवासी वस्त्या असून याच ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आणि माने इंटरनॅशनल स्कूल देखील आहे. दररोज महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा संवेदनशील ठिकाणी बार सुरू झाल्यास परिसरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.

बार सुरू करण्यासाठी चव्हाण यांनी कुवारबाव ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती. मात्र, ती ग्रामपंचायतीने स्पष्टपणे नाकारली आहे. असे असतानाही परवाना मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बारला कोणतीही परवानगी देऊ नये. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच सामाजिक समतोल अबाधित ठेवण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी.

Total Visitor Counter

2455556
Share This Article