रत्नागिरी (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती मंडळाचे ते विश्वस्त असल्याने, एका शाखेचे अध्यक्षपद सांभाळणे योग्य नसल्याचे कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
शनिवारी (ता. १३) हॉटेल विवेक येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीला मंत्री डॉ. सामंत यांच्यासह नाट्य परिषदेचे कार्यवाह वामन कदम, उपाध्यक्ष श्रीकांत भाटवडेकर, खजिनदार सतीश दळी आणि सहकार्यवाह अमेय धोपटकर यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. या बैठकीत वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, तसेच पुढील वर्षाच्या योजनांवर सखोल चर्चा झाली. गतवर्षीचा खर्च आणि पुढील वर्षासाठीच्या अंदाजपत्रकालाही या वेळी मंजुरी देण्यात आली.
याच सभेदरम्यान डॉ. सामंत यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. “मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विश्वस्त असल्याने, मध्यवर्ती मंडळाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही शाखेचे अध्यक्षपद सांभाळणे मला योग्य वाटत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. आपला राजीनामा देत असताना, नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे कार्यभार सोपवण्याची सूचना त्यांनी केली. सर्वानुमते हा निर्णय स्वीकारण्यात आला आणि इंदुलकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला.
या बैठकीत डॉ. सामंत यांनी पुढील वर्षी होणाऱ्या उपक्रमांविषयी देखील महत्त्वपूर्ण माहिती दिली. गेल्या वर्षी यशस्वी ठरलेल्या ‘नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची महास्पर्धा’ या वर्षी २ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, नाट्य परिषदेचे अधिक सभासद जोडण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले. १०० व्या नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीत होणार असल्याने, त्याची तयारी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.