GRAMIN SEARCH BANNER

पाचल-अनुस्कुरा मार्ग खड्डेमय; प्रवाशांचा त्रास वाढला

तुषार पाचलकर (राजापूर)

पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या साटवली–अनुस्कुरा–मलकापूर ते विटापेठ राज्यमहामार्गावरील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्गावर सणासुदीच्या दिवसात मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी “खड्डे की खड्यात रस्ते” अशी दृष्य दिसत आहेत.

राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी पाचल बाजारपेठ तर अक्षरशः नदीचे स्वरूप धारण करत आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कराड–मलकापूर– अनुस्कुरा–पाचल मार्गे प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात दरवर्षी अशीच परिस्थिती या मार्गावर निर्माण होते. पाचल बाजारपेठेत आठवडा बाजार भरवला जातो; त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्याने सभोवतालचे पाणी रस्त्यावर साचते आणि मार्ग नदीसारखा जलमय होतो. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागतो, परिणामी वाहतूक खोळंबते.

अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कळवूनही काहीही सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. यावर लवकर तोडगा न काढल्यास पाचल पंचक्रोशीतील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2475543
Share This Article