GRAMIN SEARCH BANNER

वाकवली शाळा ‘पीएम श्री’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये समाविष्ट; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून गौरव

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाकवली क्र. 1 ही केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांपैकी एक म्हणून निवडली गेली आहे. ब्रिटिशकालीन इतिहास लाभलेल्या या शाळेने आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधांमुळे शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या समारंभात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते या शाळेला ‘पीएम श्री’ म्हणून गौरविण्यात आले.

1896 साली स्थापन झालेली वाकवली शाळा, पहिली ते आठवी इयत्तेपर्यंत शिक्षण देते. या शाळेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विविध भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल क्लासरूम, सीसीटीव्ही, इंटरनेट, अद्ययावत ग्रंथालय, सोलर पॅनेल, सेल्फी पॉईंट, योग शिबिरे, आर्थिक साक्षरता उपक्रम आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी येथे यशस्वीपणे करण्यात आली आहे.

मंगळवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित समारंभात केंद्रीय शिक्षण मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या शाळेला रत्नागिरी जिल्ह्यातील 16 शाळांपैकी सर्वोत्कृष्ट ‘पीएम श्री’ शाळा म्हणून गौरवण्यात आले. केंद्राच्या अंतिम फेरीत वाकवली शाळेने एकूण 39 मूल्यांकन निकषांवर राष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे. एकेकाळी ‘सुतार शाळा’ म्हणून ओळखली जाणारी ही शाळा आज डिजिटल शिक्षणाच्या युगातही आपले स्थान टिकवून आहे. विद्यार्थ्यांमध्ये कार्यकुशलता, इतिहास आणि वारसा यांची ओळख तसेच जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठीही ही शाळा ओळखली जाते.

या ऐतिहासिक यशामध्ये मुख्याध्यापक जावेद शेख, शिक्षिका निवेदिता सागर आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. या यशाबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटशिक्षणाधिकारी रामानंद सांगडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नीलेश शेठ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्गेश जाधव, वाकवली ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्यासह जिल्ह्याभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article