लोकवस्तीवर कचऱ्याचा ढिगारा? – शिवसेनेचा प्रशासनाला इशारा!
लांजा: येथील नगरपंचायतीच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना (उबाठा) ग्रामस्थांसह उद्या मंगळवार दि ८ जुलै रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या बाजूने उपोषण छेडत प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधणार आहेत.
शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती दिली. लांजा नगरपंचायत आणि कोत्रेवाडी ग्रामस्थ यांच्यामध्ये डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात घमासान सुरू आहे. ग्रामस्थांनी नगरपंचायत, प्रांत कार्यालय यासह जिल्हाधिकारी कार्यालाकडे दाद मागितली होती. मात्र प्रशासनाकडून मिळणाऱ्या सहकार्यवर व पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. कोत्रेवाडीच्या नागरिकांना न्याय मिळत नसल्याने अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाने नागरिकांच्या बाजूने आवाज उठविला आहे. या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून पंधरा दिवसांपूर्वी उपोषण छेडण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. दि. ८ जुलै रोजी डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याचे रवींद्र डोळस यांनी माहिती देताना सांगितले.
प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात उबाठा सेनेने म्हटले आहे की, की, लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी येथे वस्तीलगत घनकचरा प्रकल्प राबवला जात आहे. यासाठी सर्व नियमांची पायमल्ली करत जोर जबरदस्तीने हा प्रकल्प लादला जाऊन लोकवस्तीचे जनजीवन उध्वस्थ करण्याचा एक प्रकारे घाट घातला गेला आहे. तत्पूर्वी कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी, प्रांताधिकारी, लांजा तहसीलदार, लांजा नगरपंचायत यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून आपल्या न्याय- हक्कासाठी विनंती केली आहे. त्यानंतरही शासनाने न्याय द्यावा व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी उपोषणे, आंदोलने करण्यात आली. मात्र या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे. लांजा नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला जमीन मालकांना देऊन एक प्रकारे ग्रामस्थांच्या मागणीचा अपमान केला आहे. घनकचरा प्रकल्पासाठी घेण्यात आलेली जागा व प्रक्रिया पूर्णतः नियमबाह्य असून येथील ग्रामस्थांना उध्वस्त करणारी आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ग्रामस्थांना पाठिंबा दिला असून दि. ८ जुलै २०२५ रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर शिवसेना पक्षाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे.
लांजात डम्पिंग विरोधात उद्या उबाठा शिवसेना ग्रामस्थांसह उपोषण छेडणार ; उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांची माहिती

Leave a Comment