GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यातील निर्जन बेटांवर प्रजासत्ताक दिनी दिमाखात फडकला तिरंगा

रत्नागिरी: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सहा महत्त्वाच्या बेटांवर यशस्वीरीत्या ध्वजारोहण करण्यात आले. सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व जपण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या विशेष उपक्रमामुळे किनारपट्टीवरील निर्जन बेटांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती अधोरेखित झाली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या पोलीस महासंचालक व महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निर्जन बेटांवर दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करून तिथे रात्र वास्तव्य करण्याचे निर्देश पोलीस दलाला दिले होते. याच सूचनेचे पालन करत रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यातील एकूण १३ निर्मनुष्य बेटांपैकी सहा निवडक बेटांची या मोहिमेसाठी निवड केली होती.

या मोहिमेत दापोली येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला, खेडमधील बाबा मलंग दर्गा, चिपळूणमधील गोवळकोट येथील जुवाड पेठ बेट, संगमेश्वरच्या कुरधुंडा येथील जुव्याचे पेंद, तसेच नाटे पोलीस ठाणे हद्दीतील जुवे बेट आणि वाकडवन या ठिकाणी पोलीस दलाने तिरंगा फडकवला. दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर स्वतः रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्यासह मत्स्य विभाग, बंदर विभाग, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून केवळ उत्सव साजरा न करता, सागरी सीमांच्या सुरक्षिततेबाबत आणि देशाच्या अखंडतेबाबत एक महत्त्वपूर्ण संदेश जनमानसात पोहोचवण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3483790
Share This Article