GRAMIN SEARCH BANNER

येलोंडवाडी प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनावर एल्गार; मूलभूत सुविधांविना स्थलांतर करण्यास नकार

चिपळूण: येथील येलोंडवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या स्थलांतर नोटिशीने पेटलेला वणवा आता अधिकच भडकला असून, प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत आणि संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी असंख्य ग्रामस्थांनी चिपळूण प्रांत कार्यालयावर जोरदार धडक दिली. पाणी, वीज, रस्ता यांसारख्या प्राथमिक सुविधांची पूर्तता केल्याशिवाय एकही कुटुंब स्थलांतरित होणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी १ मेपासून साखळी उपोषणाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

येलोंडवाडी प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रातील तसेच देवदेवकी आणि शिरवली परिसरातील अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. जमीन संपादन होऊन मोठा कालावधी उलटला असला, तरी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कागदावरच आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पुनर्वसन प्रस्तावित आहे, तिथे अंतर्गत गटारे, शाळा आणि आरोग्य केंद्रांची वानवा आहे. अशा परिस्थितीत केवळ नोटीस बजावून प्रशासनाने नागरिकांवर स्थलांतराचा दबाव टाकला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

यावेळी जि.प. सदस्या शिवानी सावंत यांनी प्रशासनाला धारेवर धरले. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचा बळी दिला जाऊ नये, आम्ही विकासाच्या आड नाही मात्र हक्काच्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने पदरी पडत असल्याने आता सनदशीर मार्गाने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर तातडीने सोयीसुविधांचे काम पूर्ण झाले नाही, तर १ मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे येलोंडवाडीचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, प्रशासनाच्या पुढील पाऊलाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3474609
Share This Article