रत्नागिरी: लांजा येथील एका काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून काजू गराची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला काजू गर आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण ९ लाख ४१ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लांजा येथील कोत्रेवाडी भागात असलेल्या ‘झिमण्स काजू पॉईंट’ या फॅक्टरीमध्ये २८ मे ते २९ मे २०२६ या कालावधीत ही चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी फॅक्टरी फोडून मोठ्या प्रमाणावर काजू गर लंपास केला होता. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी चोरट्यांचा कोणताही सुगावा किंवा पुरावा उपलब्ध नसताना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत चातुर्याने तपास सुरू केला. गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी शाहरुख मुराद साखरकर (वय ३०, रा. भाटये नवानगर, रत्नागिरी) आणि वजीद मोहम्मद अझीझ खान (वय ४१, रा. बांद्रा पश्चिम, मुंबई, सध्या रा. भाटये, रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सुभाष भागणे, विजय आंबेकर, अमित कदम, दिपराज पाटील आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.







