GRAMIN SEARCH BANNER

ग्रामीण वार्ताच्या वृत्ताची दखल! ‘तुंबाड’ नावावर अखेर पट्टी; महामार्ग विभागाला चूक अखेर मान्य

Gramin Varta
114 Views

रत्नागिरी : ग्रामीण वार्ताने उघडकीस आणलेल्या दिशाभूल करणाऱ्या फलक प्रकरणाची अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेतली असून, सडामिऱ्या मार्गावरील दिशादर्शक फलकावर चुकीने नमूद करण्यात आलेल्या “तुंबाड” या नावावर पट्टी मारण्यात आली आहे. ग्रामीण वार्ताने हे वृत्त प्रसिद्ध करताच विभाग खडबडून जागा झाला असून, आपल्या गंभीर चुकीची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.

रत्नागिरी परिसरातील सडामिऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या फलकावर सरळ मार्गासाठी “सडामिऱ्या” तर डावीकडे वळल्यास “तुंबाड” असे गाव असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, या परिसरात “तुंबाड” नावाचे कोणतेही गाव अस्तित्वात नसल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

ग्रामीण वार्ताने या प्रकारावर सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर अवघ्या काही वेळातच महामार्ग विभागाने फलकावरील “तुंबाड” या नावावर पट्टी मारून चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरिकांनी मात्र या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता आणि स्थानिक भूगोलाची माहिती न घेता फलक उभारले जात असल्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सरकारी निधी खर्च करून अशा प्रकारचे दिशाभूल करणारे फलक उभारले जात असतील तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही होत आहे.

ग्रामीण वार्ताच्या वृत्ताची तात्काळ दखल घेऊन चूक दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3474562
Share This Article