ठाणे : मुरबाड तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे परिसरात कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर सकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याणहून आहिल्यानगरकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसची आणि समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात स्कार्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात आराध्या (12) आणि वेदांश (3) ही दोन भावंडे सुदैवाने बचावली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस सकाळी साडेआठ वाजता विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-आहिल्यानगर मार्गावर निघाली होती. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणाजवळ बस पोहोचली असताना समोरून येणाऱ्या स्कार्पिओ मोटारीसोबत तिची जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचे छायाचित्रे आणि दृश्यचित्रफितींमधून या धडकेची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे.
अभिषेक मोहटे (45), अविनाश रामचंद्र काकडे, निता अशोक डुरे (48), मिना कल्याण मडके (47) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे सर्वजण नेवासा येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शितलकुमार नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालय टोकावडे येथे दाखल केले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही काळ परिसरात वाहतूकही विस्कळीत झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, कल्याण – मुरबाड अहिल्यानगर हा नवीन रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याच रस्त्यावर 20 दिवसांपूर्वी रायते पुलावर भीषण अपघात झाल्याने 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच दिवशी मुरबाड जवळ रिक्षाचा अपघात होऊन दोन जणांचा जीव गेला होता आणि आज हा पुन्हा भीषण अपघात झाला आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि वेगमर्यादा न पाळणे ही गंभीर समस्या असल्याचे समोर आले आहे.कल्याण स्टेशन परिसरातून मुरबाड, मानपाडा, मलंगड रोड, भिवंडी व पडघा भागात आजही काळी-पिवळी इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील धोकादायक वळणांवर वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





