GRAMIN SEARCH BANNER

मुंबई विद्यापीठाकडून उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा गौरव;मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचे वितरण

Gramin Varta
20 Views

दापोलीच्या इनाया खोत हिला सर्वोत्कृष्ट प्लॅटिनम गर्ल पुरस्कार

मुंबई: मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील सामर्थ्य आणि कौशल्य तसेच शैक्षणिक उत्कृष्टतेसह, सह-अभ्यासक्रम उपक्रमांतील सहभाग, कला, क्रीडा आणि संशोधनाच्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात आणि संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आले. शैक्षणिक उत्कृष्टक्षम प्रतिभावंतांना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय्स आणि गोल्डन गर्ल्स अशा पुरस्काराने गौरविण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये प्लॅटिनम पुरस्कारासाठी रुपये १५ हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, डायमंड पुरस्कारासाठी रुपये १२ हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि गोल्डन पुरस्कारासाठी रुपये १० हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराअंतर्गत संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली. प्रत्येकी रोख रक्कम रुपये १० हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

हे विद्यार्थी ठरले पुरस्काराचे मानकरी-

संलग्न महाविद्यालये वर्गवारीतून : (विद्यार्थी)

१) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी: गोल्डन बॉय पुरस्कार

शिवम संतोष राय, एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उल्हासनगर

२) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी: डायमंड बॉय पुरस्कार

तुषार हर्षकुमार शिरसाट, ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रज्ञान, कांदिवली, मुंबई

३) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी: प्लॅटिनम बॉय पुरस्कार

ऋषभ कल्पेश उपाध्याय, साठये महाविद्यालय, विलेपार्ले, मुंबई

संलग्न महाविद्यालये वर्गवारीतून: (विद्यार्थींनी)

४) सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी: गोल्डन गर्ल पुरस्कार

मेघना मंदार करंदीकर, विनायक गणेश वाझे कला महाविद्यालय, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड, मुंबई

५) सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी: डायमंड गर्ल पुरस्कार

किशोरी सुनील मोकाशी, एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उल्हासनगर

६) सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी: प्लॅटिनम गर्ल पुरस्कार

सुश्री आयशा इनायत खोत, दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज, दापोली, जिल्हा-रत्नागिरी

विद्यापीठ शैक्षणिक विभाग वर्गवारीतून :

७) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी: प्लॅटिनम बॉय पुरस्कार

एकनाथ अंकुश गोपाळ, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ

८) सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी: प्लॅटिनम गर्ल पुरस्कार

पलक्षी जितेन शाह, अप्लाइड सायकॉलॉजी विभाग आणि समुपदेशन केंद्र, मुंबई विद्यापीठ

संलग्न महाविद्यालये वर्गवारीतून:

९) कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती

संयोगी राजेंद्र नाईक, श्रीमती. इंदिराबाई जी. कुलकर्णी कला महाविद्यालय,जे.बी.सावंत विज्ञान महाविद्यालय आणि सौ. जानकीबाई धोंडो कुंटे वाणिज्य महाविद्यालय, अलिबाग, जि.-रायगड

विद्यापीठ शैक्षणिक विभाग वर्गवारीतून:

१०) कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती

श्वेता अनिल वराडे, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ व्यवस्थापन अभ्यास, मुंबई विद्यापीठ

विशेष कौतुकाचे मानकरी:-

११) बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत मार्शल आर्ट्समध्ये उल्लेखनीय कामगिरी (रौप्य
पदक) साठी श्रिया सुविधा मिलिंद साटम यांना गौरविण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी दीक्षान्त सभागृहात संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. भूषण पटवर्धन हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. भूषण पटवर्धन म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच सुरु केलेल्या उत्कृष्ट विद्यार्थी पारितोषिकाला भरभरून प्रतिसाद मिळाला यासाठी त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेल्या पारितोषिकांनी त्यांच्या क्षमता वृध्दींगत करण्याचा सल्ला दिला.

अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सर्वांगिण गुणवत्ता असलेला विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतो आणि संस्थेचा गौरव वाढवतो. अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणवत्तेचा सन्मान होण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई विद्यापीठाने “सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार” सुरू केला असल्याचे सांगितले. हा पुरस्कार शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, नेतृत्वगुण, सामाजिक सेवा, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जात असून अशा प्रकारच्या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टांनाही पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाने पहिल्यांदाच सुरु केलेल्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारासाठी १५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यामधून संलग्नित महाविद्यालयातील १४८ आणि विद्यापीठ विभागातून ८४ अर्ज विचारात घेण्यात आले. पुरस्कारासाठी ठरविण्यात आलेल्या निवड निकषातून सर्वोत्कृष्ट पुरस्कारांचे मानकरी ठरविण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. पराग काळकर, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये आणि प्रा. नीतिन आरोटे यांनी काम पाहिले.

Total Visitor Counter

3155318
Share This Article