साखरपा-देवरुख मार्गावर ट्रकचा भीषण अपघात; डोंगराला धडकून चालक जखमी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

साखरपा प्रतिनिधी: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरुख मार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने एक चौदा चाकी ट्रक थेट डोंगराला धडकल्याची घटना आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने ट्रकमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे आपल्या ताब्यातील रिकाम्या ट्रकने (क्र. यु पी ३५ ए टी १२९२) देवरुखकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. साखरपा-देवरुख रस्त्यावर कोंडगावपासून एक किलोमीटर अंतरावर आले असता, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कपारीत जाऊन जोराने धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकचा चालक केबिनमध्येच अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी स्थानिक पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे यांच्यासह पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण आणि मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांनी बचाव कार्यासाठी पुढाकार घेतला. रवी इन्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने ट्रकचे पत्रे बाजूला करून अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. जखमी चालक हनुमंत शिंगटे यांना तातडीने साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *