GRAMIN SEARCH BANNER

खेड: अपहरण झालेल्या ‘त्या’ १५ वर्षीय मुलीची पाच आठवड्यांनी सुखरूप सुटका;पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

खेड: तालुक्यातील बिजघर लाववाडी येथून अपहरण झालेल्या १५ वर्षीय मुलीचा शोध लावण्यात खेड पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून, या कारवाईमुळे अपूर्वा अरुण कदम ही अल्पवयीन मुलगी पुन्हा आपल्या कुटुंबात परतली आहे.

शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास अपूर्वाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी तिची आई सौ. अस्मिता अरुण कदम (वय ४०, रा. बिजघर लाववाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

शोध सुरू असतानाच खेड पोलीस ठाण्याच्या महिला व बाल कक्षातील महिला पोलीस श्रीमती विशाखा चव्हाण आणि जयश्री जाधव यांच्या पथकाला या मुलीबाबत अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६ रोजी मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक ती खातरजमा पूर्ण केल्यानंतर अपूर्वा हिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेचे सर्वत्र कौतुक केले जात असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती कनोजा करत आहेत.

Total Visitor Counter

3485489
Share This Article