लांजा : लांजा नगरपंचायतीच्यावतीने कुवे येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि पाणीप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास कचऱ्याच्या गाड्या अडवू, असा इशारा कुवे ग्रामस्थ व संघर्ष समितीने दिल्यानंतर अखेर नगरपंचायत प्रशासन नरमले आहे. पुढील पंधरा दिवसांत कुवे येथील घनकचरा प्रकल्प स्थलांतरित केला जाईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी संघर्ष समितीला दिले आहे.
शहरातील साठलेला कचरा गेल्या दोन वर्षांपासून कुवे येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी, कुत्र्यांचा त्रास आणि पाण्याचे प्रदूषण या समस्या गंभीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि संघर्ष समितीने वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती.
सोमवार, १४ जुलै रोजी ग्रामस्थ आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी नगरपंचायत कार्यालयात धडकले आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत जाब विचारला. यावेळी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर दोन दिवसांनंतर कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील.
या दबावामुळे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी संघर्ष समितीला पत्र देत सांगितले की, कचरा प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधणे सुरू असून योग्य जागा मिळताच स्थलांतराची प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी अंदाजे पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. तसेच प्रभाग क्रमांक १६ मधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामही लवकरच सुरू केले जाईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, संघर्ष समितीच्या एकजुटीमुळे नगरपंचायत प्रशासनाने मागे हटत सकारात्मक भूमिका घेतली आहे. हा लढा तात्पुरत्या स्वरूपात यशस्वी ठरला असला, तरी प्रत्यक्ष कार्यवाही पुढील पंधरा दिवसांत दिसून येणार आहे.
कचऱ्याच्या गाड्या अडविण्याचा इशाऱ्यानंतर लांजा नगर पंचायत प्रशासन नरमले
