GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : पुर्ये तर्फे देवळे येथे जुन्या वादातून लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

देवरुख प्रतिनिधी: पुर्ये तर्फे देवळे येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात राजेंद्र नारायण रामाणे (वय ५८, रा. तिवरे तर्फे देवळे वरचीवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास कोंडगाव सीमेचा पूल ते नेवरे वरचीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर सुधीर चाळके यांच्या घराकडे जाणाऱ्या वाटेवर घडली. फिर्यादी राजेंद्र रामाणे हे या रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपी सुरेश देवजी गोरुले (रा. पुर्ये तर्फे देवळे खालचीवाडी) याने त्यांना अडवले. सुमारे दोन वर्षांपूर्वी फिर्यादी यांच्या बागेतील आंबे कोणीतरी चोरले होते, त्यावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात बाचाबाची झाली होती. याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी सुरेश गोरुले याने रामाणे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने फिर्यादींच्या डोक्यात, पाठीवर आणि छातीच्या डाव्या बाजूला जोराने प्रहार केले, ज्यामध्ये फिर्यादींचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर राजेंद्र रामाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, देवरुख पोलिसांनी २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०९ वाजता आरोपी सुरेश गोरुले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ५६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, देवरुख पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गावातील जुन्या वादातून झालेल्या या हिंसक प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3483456
Share This Article