खेड : तालुक्यातील सवेणी गावातील एका तरुणाचा दुचाकी अपघातानंतर मुंबई रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुमारे महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ६ ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन सुरेश गुजर (वय ४३, रा. सवेणी, ता. खेड) हे १२ जुलै २०२५ रोजी त्यांच्या गावी दुचाकीवरून जात असताना एका चारचाकी वाहनाला मागून धडकून त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि बेशुद्ध पडले. तातडीने त्यांना कराड येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कराड येथे उपचारात काहीही सुधारणा न झाल्याने १५ जुलै रोजी त्यांना मुंबईतील कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ६ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे सवेणी गावात शोककळा पसरली आहे. खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.