देवरुख: आषाढ महिना हा निस्सिम विठ्ठल भक्त अर्थात वारकऱ्यांसाठी आनंदाचे पर्व असते. आषाढ महिन्यात पायी वारी, दिंडी आणि विठू नामाचा गजर सर्व महाराष्ट्रभर सुरू असतो. या विठ्ठलमय वातावरणात सात्विकता येते ती विठुरायाच्या अभंग, भजन आणि कीर्तनाने. प्रत्येक व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यातून त्या व्यक्तीला आणि अख्ख्या समाजाला समाधान मिळते.
मिसळून पाण्यात भक्तीचा रंग……
पाण्याखाली साकारला विठूचा संग….
वरील पंक्ती एका कलाकाराने आपल्या अनोख्या रांगोळी कलेतून कृतीत आणल्याने प्रेक्षकांना कलाकृती पाहताच समाधान मिळत आहे.
देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी अनोख्या पद्धतीने पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारून प्रेक्षकांना प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन दिले आहे. विलास रहाटे यांनी आषाढी एकादशी निमित्त पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारताना जुनी पितळेची परात, त्यामध्ये विविध रांगोळीचे रंग आणि देवरुखवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तलिंगी नदीचे पाणी वापरून ही अनोखी व कठीण रांगोळी केवळ १ तासाच्या कालावधीत पूर्ण केली आहे. पाण्याखालील रांगोळी साकारण्यासाठी कलेचा कस लागतो आणि तशी कठीण रांगोळी केवळ एका तासात पूर्णत्वाला नेणे फारच कौशल्याचे काम असते. परंतु कसबी कलाकार श्री. रहाटे यांनी ही कठीण रांगोळी पूर्णत्वाला नेऊन प्रेक्षकांची वाहवा आणि आशीर्वादही मिळवले आहेत.
श्री. विलास रहाटे आपल्या कलेतून आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची कलात्मक पद्धतीने सेवा करतात. यापूर्वी त्यांनी मोरपीस, तुळशीपत्र आणि सुपारी यावर विठुरायाची सुबक छबी साकारून विठ्ठल भक्त आणि कलाप्रेमींची शाबासकी मिळवली आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थीदशेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना संस्कृती किंवा परंपरा या विषयावर विठ्ठल, वारकरी आणि दिंडी रांगोळीतून साकारून राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. विलास रहाटे यांच्या कलेचा वारसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पुढे सुरू ठेवून राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे व पुरस्कार प्राप्त केले आहेत.