GRAMIN SEARCH BANNER

गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीत वाहतूक व्यवस्थेसंदर्भात आरटीओ कार्यालयात बैठक

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस ऑटोरिक्षा संघटना, बस वाहतूकदार, एसटी महामंडळाचे अधिकारी, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी मार्गदर्शन करताना, सर्वांनी भाविकांचा प्रवास सुरक्षित, विनाअडथळा आणि सुखकर व्हावा यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.

बैठकीत पुढील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या :

रिक्षाचालकांनी अवाजवी भाडे आकारू नये, प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करू नये तसेच शिस्तबद्धरीत्या वाहतूक करावी.

बस वाहतूकदारांनी बसमधील आपत्कालीन दरवाजा व अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. चालकांनी मद्यप्राशन करून, थकलेल्या अवस्थेत अथवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये.

एसटी महामंडळाला रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले.

बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद घाग, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर जाधव, रेल्वे पोलीस वरिष्ठ निरीक्षक सतीश विभुते, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव तसेच रस्ता कंत्राटदार, बस वाहतूकदार संघटना, जिल्हा संघटना व रुग्णवाहिका सेवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2474947
Share This Article