रत्नागिरी : स. रा. देसाई डी.एल.एड. कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पटवर्धन हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. मानसी चव्हाण उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन डी.एल.एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. सुनील जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. रोहित नाटेकर याने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक समीक्षा शितप हिने सादर केले, तर पाहुण्यांची ओळख निर्जरा ढोरलेकर हिने करून दिली. वैष्णवी दुर्गवळी हिने आभारप्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. विद्यार्थ्यांनी हा आपला पहिलाच कार्यक्रम दिमाखात सादर केला.
प्रमुख पाहुण्या डॉ. मानसी चव्हाण यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा मागोवा घेतला. टिळक यांचा सामाजिक, राजकीय, वैचारिक, बौद्धिक आणि आरोग्यविषयक बाणेदारपणा अधोरेखित केला. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. केवळ जयंत्या वा पुण्यतिथी साजऱ्या करून चालणार नाही, तर या थोर विचारवंतांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस अण्णाभाऊ साठे यांचा प्रसिद्ध पोवाडा ‘माझी मैना गावाकडे राहिली’ युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी वैष्णवी दुर्गवळी हिने सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न
