GRAMIN SEARCH BANNER

राजापूर शीळ परिसरात दोन दिवस वणव्याचा कहर; आंबा-काजू बागायती जळून खाक

Gramin Varta
13 Views

राजापूर : शहरालगतच्या शीळ गावाच्या सडा परिसरात लागलेल्या वणव्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण डोंगर भाग धगधगत होता. ग्रामस्थांनी केलेल्या अथक व प्रयत्नांमुळे अखेर हा वणवा आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र या आगीत गुरांच्या वैरणीसाठी असलेले गवत तसेच डोंगर उतारावर शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या आंबा व काजूच्या बागांना मोठी झळ बसली आहे.

शीळ येथील सड्यावर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक वणवा भडकला. सोसाट्याचा वारा आणि सुकलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरत गेली. या वणव्याची तीव्रता इतकी होती की शीळ गावासह गोठणे-दोनिवडे परिसरालाही त्याची झळ काही प्रमाणात बसली. या आगीत गवताचे विस्तीर्ण क्षेत्र आणि जंगलातील मोठा भाग जळून खाक झाला.

वणवा नेमका कसा आणि कोणी लावला, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नसली तरी या घटनेत काही शेतकऱ्यांच्या आंबा व काजूच्या बागांचे नुकसान झाले आहे. सड्यावर गुरे चरण्यासाठी असलेले गवत पूर्णपणे जळून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर वैरणीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

डोंगर परिसर पेटलेला असताना शीळ गावातील मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी सुमारे तीन ते साडेतीन तास अहोरात्र परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. या प्रयत्नांमुळे काही शेतकऱ्यांच्या बागा मोठ्या नुकसानापासून वाचल्या. मात्र बहुतांश भागातील गवत वाचविण्यात अपयश आले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तसेच त्यानंतरच्या काळात या भागात वारंवार वणव्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, वणवे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3199338
Share This Article