रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मंडणगड, गुहागर आणि राजापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १८ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चार चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई मंडणगड तालुक्यातील बाणकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेसवी नाका येथे करण्यात आली. या ठिकाणी वेसची ते मंडणगड जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर सलीम अब्दुल सत्तार मिरकर (५३, रा. बाणकोट) यांनी आपली पांढऱ्या रंगाची महिंद्रा मॅक्स गाडी (MH-06-AZ-5760) पादचारी आणि इतर वाहनांना धोकादायक ठरेल अशा स्थितीत उभी केली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलीस शिपाई आजर शेख यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दुसरी कारवाई गुहागर तालुक्यातील शृंगारतळी परिसरात करण्यात आली. येथे गुहागर-विजापूर हायवेवर महेश गोपीनाथ काताळकर (३९, रा. शृंगारतळी) यांनी आपली ॲक्टिव्हा दुचाकी (MH-08-AV-4081) पोलीस चौकी शेजारीच रस्त्यात उभी करून अडथळा निर्माण केला होता.
याच ठिकाणी काही वेळातच राजकौशल विश्वकर्मा (३४, मूळ रा. गोरखपूर) याने आपला मॅक्झिमो टेम्पो (MH-12-GT-2529) हायवेवर अशाच प्रकारे धोकादायक स्थितीत उभा केल्याचे आढळून आले. या दोन्ही प्रकरणांत पोलीस शिपाई प्रितेश रहाटे यांनी संबंधित चालकांवर कारवाई केली आहे.
चौथी कारवाई राजापूर तालुक्यातील ओणी येथे करण्यात आली. कणेरी चिकन सेंटरसमोरील सर्व्हिस रोडवर मकबूल याकूब लांजेकर (७८, रा. ओझर) यांनी आपली हुंदाई सॅन्ट्रो कार (MH-02-AP-7918) सार्वजनिक रस्त्यावर उभी करून वाहतुकीस आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस अडथळा निर्माण केला होता. याप्रप्रकरणी पोलीस शिपाई शंकर भेडसे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर आणि महत्त्वाच्या नाक्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने ही मोहीम तीव्र केली असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






