GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांचा सुळसुळाट; डिसेंबर महिन्यात ४४ हजार प्रवाशांकडून अडीच कोटींचा दंड वसूल

Gramin Varta
124 Views

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुरी पडत असल्याचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ‘फुकट्या’ प्रवाशांची मोठी घुसखोरी वाढली आहे. या वाढत्या गर्दीचा आणि विनातिकीट प्रवासाचा फटका प्रामाणिक प्रवाशांना बसत असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने आता कंबर कसली असून, विनातिकीट प्रवाशांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईच्या मोहिमेत केवळ डिसेंबर महिन्यातच कोकण रेल्वेने तब्बल ४३ हजार ८९६ विनातिकीट प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गेल्या महिनाभरात एकूण ९९८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत असल्याने ही व्यापक कारवाई करण्यात आली. केवळ एका महिन्यात झालेली ही दंडवसुली कोकण रेल्वेच्या इतिहासातील मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या संपूर्ण वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रशासनाने एकूण ८ हजार ४८१ तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या आहेत. या वर्षभरात ३ लाख ६८ हजार ९०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल २० कोटी २७ लाख रुपयांचा दंड जमा झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना वर्षभर गर्दी असते, मात्र सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट किंवा कमी अंतराचे तिकीट काढून लांब पल्ल्याचा प्रवास करताना आढळतात. या प्रकारामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय वैध तिकीट धारक प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने आपल्या तिकीट तपासणी पथकांचे जाळे अधिक विस्तारले असून, धावत्या गाड्यां सोबतच रेल्वे स्थानकांवरही कडक तपासणी केली जात आहे. आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3375164
Share This Article