GRAMIN SEARCH BANNER

देवरुख शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
372 Views

देवरुख : शहरातील बागवाडी परिसरात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रियंका प्रकाश पर्शराम यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रियंका पर्शराम व त्यांचे पती प्रकाश पर्शराम हे बागवाडी येथे वास्तव्यास आहेत. प्रकाश पर्शराम हे नेहमीप्रमाणे सकाळी सेंट्रींगच्या कामासाठी घराबाहेर पडले होते. तर प्रियंका पर्शराम या सायंकाळी घराला कुलूप लावून पठारवाडी येथे हळदीकुंकू कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.

कार्यक्रम आटोपून घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याला लावलेले कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सर आदींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पर्शराम दाम्पत्याने तात्काळ देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.

Total Visitor Counter

3225534
Share This Article