नवी दिल्ली: अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे येणाऱ्या आणखी दोन एलपीजी जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. याबाबतची माहिती विविध वृत्तांत देण्यात आली आहे.
‘सिमी’ हे एलपीजी जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना काही काळासाठी आपला ट्रान्सपाँडर बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी हे जहाज ओमानच्या आखातात दिसून आले. दुसरे एलपीजी जहाज ‘एनव्ही सनशाइन’नेही होर्मुझ सामुद्रधुनी पार करताना अशीच पद्धत अवलंबली.
पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम असताना आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याच्या परिस्थितीत ही घटना समोर आली आहे. वृत्तांनुसार, संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) रुवैस रिफायनरीमधून एलपीजी घेऊन निघालेले ‘एनव्ही सनशाइन’ हे जहाज भारतातील मंगलोरकडे जाताना शेवटचे दिसले होते. दरम्यान, ‘सिमी’ हे जहाज कतारमधील रस लाफान बंदरातून गुजरातमधील कांडला येथे इंधन घेऊन जात आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम ‘लाइफ सपोर्ट’वर असल्याचे म्हटले होते. यावरून दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप कायम असल्याचे संकेत मिळाले होते. इराणचा अणुकार्यक्रम थांबवणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असल्याचे मानले जाते.
दरम्यान, भारतीय ध्वज असलेले ‘हाजी अली’ हे पारंपरिक डाऊ किंवा मोटारचालित नौकायान जहाज सोमालियाहून यूएईमधील शारजाहकडे जात होते. बुधवारी पहाटे ओमानच्या सागरी हद्दीत या जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि नंतर ते बुडाले. या घटनेची माहिती बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगला यांनी दिली.
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले, “ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर झालेला हल्ला अस्वीकार्य असून व्यावसायिक जहाजे आणि सामान्य नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत आणि त्यांच्या बचावासाठी मदत केल्याबद्दल आम्ही ओमान प्रशासनाचे आभारी आहोत.”
ते पुढे म्हणाले, “व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे, निष्पाप नागरिक कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे किंवा नौवहन आणि व्यापाराच्या स्वातंत्र्यात कोणत्याही प्रकारे अडथळा आणणे हे पूर्णपणे टाळले गेले पाहिजे,” असे भारताने पुन्हा स्पष्ट केले आहे.







