संगमेश्वर: श्री निनावी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

संगमेश्वर (दिनेश आंब्रे):तालुक्यातील नावडी-संगमेश्वर येथील ग्रामदैवत श्री निनावी देवीचा शिमगोत्सव यंदा अत्यंत जल्लोषात आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. कोकणच्या लोकसंस्कृतीचा वारसा जपत पार पडलेल्या या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उत्सवाच्या मुख्य दिवशी देवीचे मानकरी दत्ताराम (बावा) सुर्वे व अन्य मानकरी यांच्या उपस्थितीत होळीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विधीवत गाऱ्हाणे घालून आणि होमाभोवती फेरे पूर्ण करून अग्नी प्रदीप्त करण्यात आला.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती पालखी. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत मंदिरातून वाजत-गाजत श्री निनावी देवीसह वरदानी मानाई, वाघजाई आणि विठ्ठलाई देवीची रूपे विराजमान असलेली पालखी अंगणात आणण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘देवीच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात ही पालखी भाविकांनी खांद्यावर घेऊन नाचवली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.मानकरी बावा सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, श्री निनावी देवी प्रासादिक मंडळ, संगमेश्वर येथील भंडारी, तेली, नाभिक ज्ञाती बांधव आणि मित्रमंडळाने वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या धार्मिक प्रथा व परंपरांचे जतन केले आहे. यंदाच्या उत्सवात तरुणाईचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. तरुणांनी मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि अंगणात काढलेल्या नयनरम्य रांगोळ्यांनी उत्सवाची शोभा वाढवली. या तरुणांच्या उत्साहाचे आणि सेवेचे सुर्वे यांनी विशेष कौतुक केले.उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माहेरवाशिणी आणि भक्तगण मोठ्या संख्येने दाखल झाले होते. ग्रामस्थांनी आणि आप्तेष्टांनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. कोणताही अनुचित प्रकार न घडता हा उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडला, यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे मोलाचे सहकार्य लाभले. या उत्सवाच्या निमित्ताने संगमेश्वरमध्ये धार्मिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *