रत्नागिरी : जुना माळनाका, रत्नागिरी येथील श्री. अमरदीप हरी नारकर (वय ५३ वर्षे) यांना मागील एक ते दीड वर्षांपासून उजव्या पायाच्या गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. या त्रासामुळे त्यांना व्यवस्थित चालणेही कठीण झाले होते.विविध औषधोपचार करूनही वेदना कमी होत नसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता तात्पुरता उपाय म्हणून गुडघ्याची गादी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र ही शस्त्रक्रिया खर्चिक व तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने त्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली.यावेळी उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांची भेट घेतली. तपासणीनंतर रुग्णाला संधिवातामुळे उजव्या गुडघ्याची झीज झाल्याचे निदान झाले. या आजारावर कायमस्वरूपी व प्रभावी उपाय म्हणून गुडघ्याचे सांधा प्रत्यारोपण (Total Knee Replacement) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.त्यानुसार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही अत्यंत खर्चिक व प्रामुख्याने मुंबईसारख्या मोठ्या शहरांत केली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. निखिल देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाला व्यवस्थित चालणे शक्य झाले. संपूर्ण शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.या यशस्वी उपचाराबद्दल रुग्णाने महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. निखिल देवकर व त्यांची टीम, भुलतज्ज्ञ डॉ. जमशेर, डॉ. प्रियांका व सहकारी, फिजिओथेरपिस्ट अमित वायंगणकर तसेच सर्व परिचारिका, कर्मचारी व रुग्णालयीन स्टाफ यांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच उदय सामंत प्रतिष्ठान, श्री. महेश सामंत व श्री. सागर भिंगारे यांचे विशेष आभार व्यक्त केले. शासकीय रुग्णालयात मिळालेल्या उत्कृष्ट सेवा, उपचारांची गुणवत्ता, स्वच्छता, पौष्टिक आहार व कर्मचाऱ्यांची आपुलकीची वागणूक याबद्दलही रुग्णाने समाधान व्यक्त करत कौतुक केले.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध असून, अशा यशस्वी शस्त्रक्रियांमुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात मोफत गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी






