संगमेश्वर: गेले काही महिने संगमेश्वरसह जिल्ह्यात गव्यांचा वावर सातत्याने वाढला असून, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोकणात उतरणाऱ्या गव्यांसाठी या परिसरातून गेलेल्या एका खासगी कंपनीच्या पाईपलाईनचा पट्टा सुलभ मार्ग ठरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही पाईपलाईन टाकण्यापूर्वी आणि त्यानंतर गव्यांचा वाढलेला वावर यावर शासनाने सखोल अभ्यास करावा, अशी ठाम मागणी क्रांती व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
आंबा घाट परिसरातील घनदाट जंगलात गव्यांचा नैसर्गिक अधिवास असताना, या परिसरात गॅस पाईपलाईनसाठी तयार करण्यात आलेला काँक्रिटचा पट्टा गव्यांसाठी कोकणात उतरण्याचा मार्ग बनतोय का, याचा वैज्ञानिक अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे. साखरपा, देवरूख आणि संगमेश्वर परिसरात सध्या गव्यांचा उपद्रव कमालीचा वाढला असून, ही पाईपलाईन टाकण्यापूर्वी या भागात गव्यांचा वावर कसा होता, हे तपासण्यासाठी वनविभागाच्या जुन्या नोंदी, शेती नुकसानीचे पंचनामे, ग्रामस्थांच्या तक्रारी आणि जीआयएस मॅपिंगच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे.
गवे त्या पाईपलाईनच्या मार्गावरून नेमके किती अंतर चालतात, हे शोधण्यासाठी या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावावेत आणि आवश्यकता भासल्यास गव्यांना रेडिओ कॉलर लावून त्यांच्या हालचालींवर सूक्ष्म लक्ष ठेवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गवा आणि मानव यांच्यातील संघर्ष कायमस्वरूपी रोखण्यासाठी देवरूख परिसरात स्वतंत्र संवर्धन क्षेत्र अर्थात अभयारण्य निर्माण करण्याची व्यवहार्यता शासनाने तपासावी, असा महत्त्वपूर्ण पर्यायही संघटनेने सुचवला आहे. वनविभाग, महसूल विभाग, स्थानिक प्रशासन, वन्यजीव तज्ज्ञ आणि संबंधित कंपनी यांची एक संयुक्त समिती स्थापन करावी आणि गवे ज्या मार्गाने वस्त्यांमध्ये उतरतात, त्या संवेदनशील ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी आक्रमक भूमिका क्रांती व्यापारी संघटनेने घेतली आहे. गव्यांच्या मार्गावर कडक बंदोबस्त करून शेतकऱ्यांची शेती सुरक्षित करावी, गव्यांना जंगल, शेतकऱ्यांना सुरक्षित शेती आणि शासनाला जबाबदारी हे तिन्ही एकाच वेळी सुनिश्चित झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी व्यक्त केली आहे.





