GRAMIN SEARCH BANNER

सागवे हायस्कूलमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ;पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेला शिक्षक पुन्हा हजर

पालकांचा तीव्र संताप

राजापूर : तालुक्यातील सागवे हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेला शिक्षक बलवंत आनंदा मोहिते पुन्हा शाळेत हजर झाल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या सप्टेंबर २०२४ मध्ये याच शिक्षकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचे गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेअंती, त्या शिक्षकाला शाळेत पुन्हा न घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. यामुळे काही प्रमाणात शांतता प्रस्थापित झाली होती.

मात्र, सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी बलवंत मोहिते हा शिक्षक अचानक शाळेत हजर झाल्याचे पाहून पालक आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. संतप्त जमावाने तात्काळ शाळेवर धाव घेतली आणि मुख्याध्यापक व प्रशासनाला जाब विचारला. “ज्याच्यावर आमच्या मुलींशी गैरवर्तनाचे आरोप आहेत, त्याला पुन्हा शाळेत कसे घेतले?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला.

सप्टेंबर २०२४ पासून हा शिक्षक शाळेत गैरहजर असतानाही त्याला शाळेबाहेरून मस्टर देऊन आतापर्यंतचा सर्व पगार काढण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला. आज त्याने शाळेत हजर होत असल्याचे पत्र दिल्यावर त्याला तात्काळ शाळेत घेतले गेले, याचा अर्थ मुख्याध्यापक आणि प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. जोपर्यंत या शिक्षकाला शाळेतून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा निर्धारही पालकांनी व्यक्त केला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, नाटे पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ सागवे हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी बलवंत मोहिते या शिक्षकाविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणामुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, पालकांनी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शाळा संस्था आणि प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, संस्थेकडून त्या शिक्षकाला शाळेत हजर न होण्यास सांगण्यात आले होते आणि आज तो शाळेत हजर झाल्यानंतर त्याची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली नाही, असे समजते.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि त्यांचे सहकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article