GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरमध्ये खताचा तुटवडा; शेतकरी हवालदिल

Gramin Search
10 Views

संगमेश्वर : खरीप हंगामाच्या तोंडावर संगमेश्वर तालुक्यात खताच्या तुटवड्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत. खत विक्री केंद्रांवर पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अपुऱ्या खतावरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळपासूनच खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत असून, अनेक तास वाट पाहूनही आवश्यकतेप्रमाणे खत मिळत नाही. काही शेतकऱ्यांना 90 किलो खताची गरज असताना फक्त 20 किलो खत मिळत असल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती प्रगतशील शेतकऱ्यांनाही संकटात टाकणारी ठरत आहे.

भात लावणीस सुरुवात होण्याची वेळ जवळ आली असतानाही शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने, ‘शेती करायची तरी कशी?’ असा सवाल शेतकरी विचारत आहेत. खताच्या तुटवड्यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खत पुरवठा नियमित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी आणि कृषी संघटनांकडून करण्यात येत आहे. खत विक्रीचे योग्य नियोजन न झाल्यास खरीप हंगामावर संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Total Visitor Counter

2651829
Share This Article