GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : चिपळुणात गवारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार ठार

Gramin Varta
1.3k Views

चिपळूण – तालुक्यातील गुढे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. ५५ वर्षीय रवींद्र पांडुरंग आग्रे (गुढे-जोगळेवाडी) यांना दुचाकीवरून जात असताना गवारेड्याने जोरदार हल्ला करून ठार केले. ही घटना दुपारी सुमारे १२.३० वाजता मोरेवाडी स्मशानभूमीजवळ घडली.

सविस्तर माहिती अशी की, आग्रे हे मार्गतम्हणे बाजारातील डॉक्टरांकडे जात होते, तेव्हाच अचानक गवारेड्या समोर आले आणि त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रचंड हल्ल्यात दुचाकी चुराडली गेली, आग्रे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. रस्त्यावरून जात असलेल्या एका नागरिकाच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आग्रे यांना मृत घोषित केले.

ही घटना विशेषत: धक्कादायक आहे कारण फक्त चार दिवसांपूर्वीच कळंबट परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला घडला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन कामथे उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Total Visitor Counter

2652089
Share This Article