GRAMIN SEARCH BANNER

शिवाजी पार्कवरील चिखल म्हणजे कमळाबाईची कृपा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
215 Views

राज ठाकरेंची अनुपस्थिती- मेळाव्यात पावसाची हजेरी

मुंबई: एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद लावला जातोय. दुसरीकडे कमळाबाईच्या कारभाराने स्वत:ची कमळे फुलवून घेतली आहेत.

पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करुन दिलाय. आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जो चिखल झाला ती कमळाबाईची कृपा आहे, अशा शब्दात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. तसेच तुमची हिंंमत असेल तर पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा, असं आव्हानही त्यांनी भाजपाला दिले. मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला. त्यात ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केले.

मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांना निमंत्रण न दिल्याने ते उपस्थित राहिले, अशी माहिती समोर आली. मेळाव्यादरम्यान वरुणराजानेही हजेरी लावली. त्यामुळे काही वेळासाठी शिवसैनिक भिजले आणि त्यांनी बसायच्या खुर्च्या डोक्यावर घेऊन पावसापासून आपला बचाव केला. व्यासपीठ देखील खुले ठेवल्याने ठाकरेंनी पावसात भिजतच भाषण केले.

शेतकऱ्याच्या घरादाराचं चिखल झाला आहे. शेती वाहून गेली आहेच, पण घरादारातही चिखल झाला आहे. शेतकरी आज विचारतोय आम्ही खायचं काय, ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. मराठवाडा आपत्तीग्रस्त झाला आहे. हे संकट फार मोठं आहे. जे करता येईल ते फूल नाहीतर फुलाची पाकळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देऊ. ते करायला पाहिजे, असं आवाहन करतानाच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करा, अशी मागणीही केली.

यानंतर, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १०० व्या दसरा मेळाव्यावर भाषण केले. गांधींच्या जयंतीच्या दिवशीच संघाचा १०० वा वर्धापन दिन आला आहे, तर याचा अर्थ काय? संघाच्या शंभर वर्षांच्या कष्टाला विषारी फळे लागली आहेत. मोहन भागवत मुस्लिम नेत्यांसोबत बसतात आणि दुसरीकडे भाजपचे लोक हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवत आहेत. भाजपला आकार नाही, रूप नाही, ध्येय नाही, धोरण नाही तो कसाही वाढतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी संघावर आणि भाजपवर टीका केली. क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा बेशरम आहे. भाजपची औलाद पगारी मतदार तयार करत आहे, असंही ठाकरेंनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. संघाला १०० वर्षे झाली आहेत. ही काही थोडीथोडकी वर्षे नाहीत. संघाच्या शंभरीला गांधी जयंंती आहे. हा काय योगायोग आहे का? मला कळत नाही. जशी संघाला १०० वर्षे झाली आहेत. आता लढणारी माणसं आता कमी झाली आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी वाटचाल आणि नीती या सरकारची आहे. सोनम वांगचुक या माणसाने अत्यंत दुर्गम भागात हाडं मोडणाऱ्या थंडीत आपले जवान नीटनेटके रहावेत म्हणून सोलार टेन्कॉलॉजीवर छावण्या बांधून दिल्या. पाण्याचं दुर्भिक्ष्य होऊ नये म्हणून आईस स्तुपाची योजना आणली. त्याने न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरु केलं. लेह लडाखसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरु केलं. त्यानंतर सगळे पेटले, लेह लडाखमध्ये सुरु झालं. त्यानंतर मोदीबाबांनी त्यांना उचलून रासुका खाली त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकलं. मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते. शिष्टमंडळातर्फे ते पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवलं गेलं अशीही टीका ठाकरेंनी केली.

आता घरुन येताना मी आजूबाजूला पाहत होतो. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर कितीही शाल टाका, गाढव ते गाढवच. जसा संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शाह यांच्या जोड्यांचं भार वाहणारं हे गाढव. जाऊ द्या त्यांचे जोडे त्यांना लखलाभ. जनता पण मारणार एकदिवस, तो दिवसही लांब नाही, असेही ठाकरे म्हणाले.

Total Visitor Counter

2654884
Share This Article