GRAMIN SEARCH BANNER

खेड: रानडुकराची शिकार करणाऱ्याला अटक, ९६ जिवंत गावठी बॉम्ब जप्त

Gramin Varta
542 Views

खेड: तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान परिसरात रानडुकराची शिकार करणाऱ्या टोळीवर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बाबू भागोजी शिंदे (रा. माणी, खेड) याला वन विभागाने शिताफीने अटक केली असून, त्याचे दोन साथीदार जंगलाचा फायदा घेत पसार झाले आहेत. संशयिताकडून ९६ जिवंत गावठी बॉम्ब आणि दोन मृत रानडुकरे जप्त करण्यात आली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काडवली परिसरात वन विभागाच्या पथकाकडून व्याघ्र गणनेचे काम सुरू होते. यावेळी निगडे-बोरज सीमेवरील राजेश भानुशाली यांच्या मालकीच्या माळरान क्षेत्रात तीन व्यक्ती दोन मृत रानडुकरे घेऊन जाताना वनपालांच्या निदर्शनास आल्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच या संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून बाबू शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता काळ्या रंगाच्या बॅगेत पिवळ्या पिशवीमध्ये तब्बल ९६ जिवंत गावठी बॉम्ब सापडले. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल उदय भागवत, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, अशोक ढाकणे, रानबा बंबर्गेकर, वैभव काट्येखाये आणि प्रियांका कदम यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई पूर्ण केली. फरार झालेल्या अन्य दोन संशयितांचा वन विभागाकडून कसून शोध घेतला जात आहे.

Total Visitor Counter

3369591
Share This Article