GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील मंदिरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; दोन चोरट्यांना अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
370 Views

रत्नागिरी : रत्नागिरीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदिलवाडी, ता. पलूस, जि. सांगली) आणि संभाजी राजाराम जाधव (वय ३०, रा. विकास कारखान्याजवळ, पलूस, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या तसेच सांगली शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सांगली शहरातील राम मंदिराजवळील संजोग कॉलनीत राहणारे सम्राट विश्वनाथ माने (वय ५३) यांच्या बंगल्यात २५ डिसेंबर २०२५ रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी माने यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाला आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला.

मिळालेली माहिती खरी ठरली. दोन्ही संशयित त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्या दुचाकीवरील गोणपाटात चांदी, तांबे व पितळेचे पूजेचे साहित्य आढळून आले. तसेच अक्षय मोरेच्या खिशात चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र सापडले.

पोलिस तपासात पुढे असेही उघड झाले की, अक्षय मोरे याला यापूर्वी आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरातील चोरीप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याने संभाजी जाधवच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या. २९ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरीतील एका मंदिरात सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व हार चोरल्याचे तसेच अर्जुनवाड येथील मंदिरातील गणेशमूर्ती चोरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3366867
Share This Article