GRAMIN SEARCH BANNER

हिमालया योगा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीची उत्तम कामगिरी

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी: रत्नागिरीच्या सौम्या मुकादम, प्रतीक पुजारी, श्रिजा सलपे यांना हिमालया योगा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. योगामध्ये रत्नागिरीने आतापर्यंत कमावलेल्या नावलौकिकात बंगळुरू येथे झालेल्या हिमालया योगा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून या तिघांनी आणखी भर घातली आहे

एस-व्यासा म्हणजेच स्वामी विवेकानंद योग संस्थान बंगळुरू ही संस्था योगामध्ये भारतात व भारताबाहेरही नावाजलेली आहे. या संस्थेची ही स्पर्धा बंगळुरू येथे १२ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये झाली. या स्पर्धेत १५ राज्यांनी आपले संघ उतरवले होते.

महाराष्ट्र संघामध्ये रत्नागिरीतील सौम्या देवदत्त मुकादम, समर्थ विनायक कोरगावकर, राधिका मंदार पेडणेकर, प्रतीक पुरंदर पुजारी, श्रेया बलिराम तारे, रत्नेश हितेश आडिवरेकर, सोहम विजय बंडबे आणि श्रिजा सिद्धेश सलपे या ८ जणांचा समावेश होता.

सौम्या देवदत्त मुकादम हिने १४ ते १७ वयोगटात खेळत मुलींमध्ये तर प्रतीक पुरंदर पुजारी याने मुलांमध्ये सुवर्णपदक मिळवले. सौम्या रत्नागिरीतील जीजीपीएस गुरुकुलमध्ये शिकत आहे, तर प्रतीक पुरंदर पुजारी हा शिर्के शाळेचा विद्यार्थी आहे. खुल्या गटात श्रिजा सिद्धेश सलपे यांनाही सुवर्णपदक मिळाले असून, त्या महावितरणमध्ये कार्यरत आहेत.

या स्पर्धेमध्ये ९ ते १३ या वयोगटात समर्थ कोरगावकर (जीजीपीएस गुरुकुल), श्रेया तारे (एसव्हीएम्), सोहम बंडबे व राधिका पेडणेकर (रा. भा. शिर्के प्रशाला) यांनी रौप्य तर रत्नेश आडिवरेकर (अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज) याने कास्यपदक मिळविले आहे.

या सर्वांना शिवयोगा क्लासेसचे दुर्वांकुर अविनाश चाळके यांनी प्रशिक्षण दिले आहे. गेली अनेक वर्षे ते जीजीपीएस, शिर्के हायस्कूल येथे कॉम्पिटिटिव्ह योगासाठी मोफत प्रशिक्षण देतात. साईमंदिर हॉल (साळवी स्टॉप) येथे ते स्पर्धात्मक योगासाठी शाळेच्या मुलांना मोफत मार्गदर्शन करतात.

या स्पर्धेत खेळाडूंना वेगवेगळ्या चाचणीतून जावे लागते. स्पर्धेचे मूल्यांकन आसने, मुद्रा, क्रिया आणि लेखी परीक्षा या चार प्रकारांनी केले जाते.

Total Visitor Counter

3388100
Share This Article