रत्नागिरी: तालुक्यातील हातखंबा येथे २८ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या टँकर अपघातप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सय्यद खाजा पाशा (वय ५०, रा. हैदराबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद पाशा हा गॅस टँकर (एपी ३९ टीएफ ०१५७) वेगाने चालवत होता. हातखंबा गावाच्या वळणावर त्याचे नियंत्रण सुटले आणि टँकर उलटला. अपघातानंतर तात्काळ गॅस गळती सुरू झाली, मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना टळली.
या प्रकरणी पोलिसांनी सय्यद खाजा पाशा याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५(अ), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता.