GRAMIN SEARCH BANNER

थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या
लोटे परशुराम एमआयडीसी मधील कारखान्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार सुनील तटकरे

रत्नागिरी : कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता पावसाचा फायदा घेवून लोटे परशुराम एमआयडीसीमधील जे कारखाने थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करत आहेत, अशा कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करुन कारवाई करावी, अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक आज झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

खासदार श्री. तटकरे यांनी प्रत्येक विषयावर सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरांबाबत दिशा समितीच्या सदस्यांना निमंत्रित करावे. लाभार्थ्यांची निवड कशा पध्दतीने झाली, याची तालुकानिहाय माहिती द्यावी. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ अधिकाधिक देण्यासाठी महावितरणने गतीने काम करावे. कोकण रेल्वेने जिल्ह्यातील रेल्वे प्लॅटफार्मची उंची वाढवावी. त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्तांमधून भरती करण्याला प्राधान्य द्यावे. खनिकर्मच्या निधीचे 7 भागांमध्ये वाटप करावे. जलजीवन मिशनमध्ये पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या योजनांची तालुकानिहाय यादी द्यावी. त्याचबरोबर ही कामे करणाऱ्या ठेकेदारांबाबत तपशिलवार नावे द्यावीत. ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले असेल त्याठिकाणी टँकर सुरु असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची पडताळणी करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.

गुहागरमधील पाणी पुरवठा योजना पूर्ण करावी. तसेच स्ट्रीट लाईटचा विषय मार्गी लावावा. पाचपांढरी गावालाही प्रांताधिकारी, तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, एमएमबीच्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. तेथील स्थानिकांशी चर्चा करुन समस्येंचे निराकरण करावे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये दर्जेदार कामे व्हावीत. ही कामे वेळेत सुरु करुन वेळेत संपवणे आवश्यक आहे. जे काम आवश्यक आहे ते केले पाहिजे. घाई गडबडीत काही चुका झाल्या असतील तर त्याची दुरुस्ती करा. कोकाकोला कंपनीच्या विरोधात मुकमोर्चा काढणाऱ्या 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत एसपींनी तात्काळ अहवाल द्यावा. चुकीचे झाले असेल तर हा विषय संपवावा. माझ्या मतदार संघात अशी चुकीची कारवाई खपवून घेणार नाही. कोकाकोला कंपनींने स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -
Ad image

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी विषय वाचन केले. अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह सदस्य सतीश दिवेकर, सखाराम कदम, सुरेश सावंत, नेहा जाधव, संदीप बांदकर आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

Total Visitor

0214187
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *