संगमेश्वर: २१ जून, जागतिक योग दिनानिमित्त निवे बुद्रुक येथे ग्रामपंचायत सभा हॉलमध्ये महिला व मराठी प्राथमिक शाळेतील लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत योग मार्गदर्शन सत्र प्रचंड उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. योगाभ्यासाचे महत्त्व समाजात रुजवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला महिला व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
या विशेष सत्रासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आणि एम.ए. (योगशास्त्र) पदवीधारक सौ. ईश्वरी राहुल यादव यांनी मार्गदर्शन केले. योगदिनाच्या पूर्वसंध्येलाच या कार्यक्रमाची जोरदार प्रसिद्धी करण्यात आली होती, ज्यात योगाचे महत्त्व, सत्राची वेळ, स्थळ आणि कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या मुद्द्यांची सविस्तर माहिती देण्यात आली होती. योगाचा इतिहास आणि मूलतत्त्वे, स्त्रियांसाठी उपयुक्त योगासने, प्राणायामाचे महत्त्व, दैनंदिन आरोग्यविषयक सल्ला आणि प्रश्नोत्तर सत्र अशा विविध भागांचा यात समावेश होता.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या सत्रात सहभागी महिला आणि मुलांनी मोठ्या उत्साहाने योगासने आणि प्राणायामाचे धडे गिरवले. सौ. यादव यांनी अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत योगाचे फायदे समजावून सांगितले. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, ताण-तणाव कमी करण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढण्यास कशी मदत होते, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व सहभागी महिला, मुले, शिक्षक आणि मान्यवरांचे सौ. ईश्वरी राहुल यादव आणि आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांमुळे गावातील लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून, निरोगी जीवनाकडे एक पाऊल टाकण्यास त्यांना प्रोत्साहन मिळत आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.