वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संगमेश्वर पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
संगमेश्वर/ दिनेश आंब्रे: गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी गणरायाचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. संगमेश्वर येथे सोनवी आणि एसटी स्टँड परिसरात परतीसाठी निघालेल्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस आणि होमगार्ड दिवसरात्र प्रयत्न करत आहेत.
गेले काही दिवस गणेशोत्सवासाठी आलेल्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र, बुधवारी पहाटेपासून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याने संगमेश्वरमधील चारही रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली. अवजड वाहनांना काही दिवस बंदी असतानाही ती रस्त्यावर दिसल्याने या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि होमगार्डची टीम वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. केवळ वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासोबतच पोलिसांकडून माणुसकीचे दर्शनही घडत आहे. पोलीस अंमलदार विश्वास बरगाळे यांनी वयोवृद्ध नागरिकांना तर रियाज मुजावर यांनी एका दिव्यांग व्यक्तीला सुरक्षितपणे रस्ता ओलांडून दिला.
पोलीस अंमलदार किशोर जोशी, विनय मनवल, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजया तांबडे, उपनिरीक्षक शंकर नागरगोजे आणि जाधव तसेच होमगार्ड यांनी या काळात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. पावसाची तमा न बाळगता केलेल्या त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. गणेशोत्सवादरम्यान पोलीस, आरोग्य कर्मचारी, वाहतूक पोलीस, कृषी कर्मचारी आणि महसूल अधिकारी यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.