रोहित पवारांनी शिवतीर्थावर घेतली राज ठाकरेंची भेट

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

मुंबई: रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत मराठी माणसाला न्याय मिळत नसल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली.

विशेषत: अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणातील चौकशीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी या विषयात मनसेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.

भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी तातडीने वेळ दिली आणि जवळपास सव्वातास सविस्तर चर्चा झाली. सुरुवातीला नेमका विषय काय आहे, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली असता अजित दादांच्या अपघातासंदर्भातील संशय आणि घातपाताच्या शक्यतेविषयी माहिती द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. दादांशी जुने संबंध असल्यामुळेच राज ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने ऐकून घेतल्याचे रोहित पवार म्हणाले.

या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही, हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करत सुप्रीम कोर्टाच्या दोन महत्त्वाच्या दाखल्यांचा उल्लेख केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. अपघाती मृत्यूची नोंद झाल्यानंतरही आवश्यक असल्यास एफआयआर दाखल करणे बंधनकारक असते, तसेच कोणतीही तक्रार आल्यास पोलिसांनी एफआयआर घेणे कायद्याने आवश्यक आहे, असे मत राज ठाकरे यांनी मांडल्याचे ते म्हणाले.

रोहित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीची तक्रारच नोंदवली जात नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. मराठी माणसाला न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते करू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. अजित दादांशी आपण जवळून काम केले असून वैयक्तिक संबंधही होते, त्यामुळे हा विषय आपल्यासाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा दिनाच्या दिवशीच ही भेट झाल्याचा उल्लेख करत रोहित पवार म्हणाले की, मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे सातत्याने लढत आले आहेत. त्यामुळे दादांच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मनसेने आपल्या पक्षाच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीने साथ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर राज ठाकरे यांनी विचार करण्याची गरज नसून आपण दादांसोबत आहोत आणि न्याय मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मनसे या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *