रत्नागिरी: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मनुज जिंदल हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. शासनाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची बदली केली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल यांची नियुक्ती ‘जिल्हाधिकारी, रत्नागिरी’ या पदावर वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आली आहे.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश श्री. मनुज जिंदल यांना त्यांच्या सध्याच्या ‘सह व्यवस्थापकीय संचालक, म.रा.र.वि.मं., मुंबई’ या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, रत्नागिरीतील नवीन पदाचा कार्यभार श्री. एम. देवेंदर सिंह यांच्याकडून त्वरित स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची कारकिर्द
महाराष्ट्र कॅडरमधील तरुण व लोकाभिमुख अधिकारी म्हणून मनुज जिंदल (IAS) यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. २०१७ च्या बॅचमधील हे अधिकारी आपल्या पारदर्शक कामकाज, नवकल्पना आणि जनसहभागी प्रशासनामुळे ओळखले जातात.
मनुज जिंदल यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून अर्थशास्त्र विषयात बी.ए. (ऑनर्स) पदवी घेतली असून, त्यानंतर त्यांनी हार्वर्ड केनेडी स्कूल, अमेरिका येथून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी काही वर्षे जेपी मॉर्गन चेस, लंडन येथे इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले.
कार्पोरेट क्षेत्रातील चांगले करिअर सोडून त्यांनी भारतात परत येत UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत २०१६ साली ५३वा क्रमांक मिळवत भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
२०१८ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. ग्रामीण भागातील प्रशासनात लोकसहभाग वाढवणे, पारदर्शकता आणणे आणि नागरिकांशी थेट संवाद साधणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यानंतर २०१९ ते २०२२ या कालावधीत ते भंडारा जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले. “भंडारा मॉडेल” म्हणून ओळखले जाणारे त्यांच्या डिजिटल शिक्षण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले. ग्रामपंचायतींच्या कामकाजात डिजिटल प्रणालीचा वापर करून त्यांनी ई-गव्हर्नन्सचा आदर्श निर्माण केला.
२०२२ पासून ते महाराष्ट्र शासनात उपसचिव या पदावर कार्यरत असून राज्यस्तरीय धोरणनिर्मिती आणि प्रशासनिक सुधारणा यांवर ते काम करत आहेत. शासन यंत्रणेतील तरुण पिढीला प्रेरणा देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
मनुज जिंदल हे सोशल मीडियावरही सक्रिय असून, YouTube आणि Instagram च्या माध्यमातून ते तरुणांना प्रशासन, UPSC तयारी आणि नेतृत्व याबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्या व्याख्यानांमधून “प्रामाणिक सेवा आणि नवकल्पक दृष्टिकोन” यांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
मनुज जिंदल हे केवळ एक अधिकारी नसून, जनतेशी जोडलेले आणि परिवर्तनाची भावना असलेले अधिकारी म्हणून आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत प्रेरणादायी ठरले आहेत.